पिंपरी (Pclive7.com):- वंचित, उपेक्षित, भटक्या समाजासाठी कार्य करणारे चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश प्रभुणे यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभुणे यांचा सत्कार केला.
४० वर्षांपासून प्रभुणेकाका भटक्या समाजासाठी कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली. त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड शहराची मान उंचावल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, चापेकर समितीचे सहकार्यवाह रविंद्र नामदे, बशीर सुतार, गतीराम भोईर यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”प्रभुणेकाकांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले आहे. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरत कार्य करीत आहेत.
वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांच्या कल्याणासाठी ते झटत आहेत. पुनरुस्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांचे कार्य वाखण्याजोगे आहे”.