पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण जगाला हादरून टाकलेल्या जिवघेण्या कोरोना विषाणूच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात आज (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला सर्व भारतीयांनी पाठींबा दिला आहे. पिंपरी चिंचवडकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरात १०० टक्के कडकडीत बंद ठेवला असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोनाचे राज्यात ६४ तर पुणे जिल्ह्यात २३ रूग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक १२ रूग्ण पिंपरी चिंचवड शहरात आढळले असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१८ पासून शहरातील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र तरी देखील पिंपरी चिंचवडकरांनी त्या निर्णयाची दखल गांभिर्याने घेतली नसल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन दिवसांत घराबाहेर न पडण्याचे आदेश असताना सर्रासपणे नागरिक घराबाहेर पडलेले दिसत होते. मात्र आज जनता कर्फ्यला पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
शहरातील दुध वितरक आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनी सकाळी सातपूर्वी ग्राहकांच्या घरी दूध व वृत्तपत्रे पोहचविण्याची व्यवस्था केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कंपन्या, उद्योग, व्यवसाय, दुकाने बंद असल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या कामगारांची लगबग व गर्दी कोठेही दिसली नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. रिक्षा व टॅक्सी देखील पाहायला मिळत आहे. कायम वर्दळ असलेल्या पिंपरी चौकात, पिंपळे सौदागरमधील शिवार चौकात आज शुकशुकाट पहायला मिळाला. शहरातील प्रत्येक चौकांमध्ये पोलीस कर्मचारी पाहायला मिळत असून खासगी दुचाकी किंवा खासगी मोटारींची अत्यंत तुरळक वाहतूक पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे तपासून सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.