पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘दिव्यांग व्यक्तींना चलन-वलन साधणे वाटप अर्थसहाय्य योजने’च्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता या साहित्यासाठी लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना चलन-वलन साधणे वाटप अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी देण्यात येणा-या दहा हजार रुपयांच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करून २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील दिव्यांगांना चलन-वलन साहित्य घेण्यासाठी दहा हजार रुपये (एकदाच) अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि चलन-वलन साहित्याच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता त्यामध्ये वाढ करण्यची मागणी विविध संस्थांनी महापालिकेकडे केली होती.
महापालिकेने ही बाब विचारात घेऊन दिव्यांगांसाठीच्या चलन-वलन साहित्यामध्ये वाढ केल्याचे महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी जाहीर केले. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.