पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या वर्षी सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पवनाथडी जत्रेत आज फलकबाजीवरून ‘राडा’ झाला. जत्रेत येणाऱ्या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांवरून सांगवीतील राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामध्ये ‘शाब्दिक’ चकमक उडाली. हा प्रकार सायंकाळी सातच्या सुमारास घडला.
सांगवी येथे काल दि.४ पासून पवनाथडी जत्रेला प्रारंभ झाला. येथे येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीकडून फलक लावले होते. मात्र ते अनधिकृत फलक असल्याचे सांगत प्रशासनाने ते काढून टाकले. हे फलक काढल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपसह महापालिकेचे अनधिकृत फलक काढण्यासाठी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकाराची माहिती मिळताच माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, शाम जगताप, तानाजी जवळकर, कालिदास पिल्लेवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी पोहचले. त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याचा जाब विचारून महापालिकेने व सत्ताधारी भाजपाने लावलेले अनधिकृत फलकही काढण्याची मागणी केली. त्यानंतर आयुक्तांनी सर्वच अनधिकृत फलक काढण्याचे तात्काळ आदेश दिले. त्यामुळे तातडीने महापालिकेच्या वतीने अनधिकृत फलक काढण्यात आले. दरम्यान कार्यकर्ते आणि आयुक्त यांच्यात झालेल्या ‘शाब्दिक’ चकमकीमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू आयुक्तांनी भाजपाकडून लावण्यात आलेले फलक काढायला लावल्यामुळे हा वाद मिटला.