पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे १२ ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आहेत. या रूग्णांची प्रकृती स्थिर असून महापालिकेचे संत तुकारामनगर येथील वायसीएम रूग्णालय तसेच भोसरीतील नवीन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज (दि.२२) रोजी ९ व्यक्तींचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात अाले आहेत. तर आजपर्यंत घश्यातील द्रव्यांची तपासणी केलेल्या शहरातील व्यक्तींची संख्या १२१ झाली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत. आज दि.२२ अखेर शहरातील ३ लाख ३७ हजार २७२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातमध्ये आज अखेर बाहेर देशातून आलेल्या ९१० व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आलेले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस स्वत:हून घरामध्येच (Home Quarantine) मध्ये रहावे व जे नागरिक घरामध्ये (Home Quarantine) राहणार नाहीत अशा नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच उपरोक्त नमूद देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात आले आहे.