पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी मंगळवारी तब्बल १५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रत्येकाने केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. पक्ष निरीक्षक कोणाचे नाव पुढे पाठविणार आणि प्रदेश समितीकडून कोणाच्या नावाच्या मोहोर उमटणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सचिन साठे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे.
प्रदेश सरचिटणीस व पिंपरी चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम झाला. इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह सकाळपासूनच कार्यालयात आले होते. आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी, यासाठी समर्थक सतत घोषणा देत असल्याने परिसर दुमदुमून गेला.
यावेळी इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्न विचारून त्यांची मते आजमावून घेतली. आता या बाबतचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर मुंबईहून अध्यक्षपदाची घोषणा होईल. दरम्यान, कोणाला पद मिळणार याची उत्सुकता इच्छुकांसह समर्थकांना लागली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, दिलीप पांढारकर, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान कॉंग्रेस सभा अध्यक्ष सरिता जामनिक, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, माजी शहर युवक अध्यक्ष सचिन कोंढरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह १५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.