पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ फेब्रुवारीला ह्या बहुचर्चित मुलाखतीचा कार्यक्रम साकारला जाणार आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ही जाहीर मुलाखत रंगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील या दोन दिग्गज नेत्यांचा राजकारणासोबतच सामाजिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये वावर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या मिश्किल टिप्पणी करण्याच्या हातोटीमुळे या मुलाखतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सुरवातीला ३ जानेवारीला ही मुलाखत होणार असे जाहीर करण्यात आले होते. पुण्यात जानेवारी महिन्यात जागतिक मराठी अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या संमेलनात ही मुलाखत होणार होती. मात्र काही कारणामुळे ६ जानेवारीला मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली. दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
आता अखेर या लक्षवेधी मुलाखतीसाठी २१ फेब्रुवारीचा मुहूर्त सापडलाआहे. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची ५० वर्ष आणि शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांची आगळी वेगळी मुलाखत घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र या मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून कोण असावे यावर मोठा खल झाला आणि अखेर राज ठाकरे यांचे नाव समोर आले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा योग जुळवून आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या मुलाखतीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र तारीख जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष मुलाखतीचा योग जुळून आला नव्हता.