पुणे (Pclive7.com):- जुन्नर तालुक्यातील इंगळूण या दुर्गम व आदिवासी पाड्यावरील आदिमाया माध्यामिक शाळेला रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांनी रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ यांच्या सहाय्याने नुकताच एक ई लर्निंग संच भेट दिला. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे प्रेसिडेंट रो. विलास गावडे, रो. सतीश आचार्य, रो. वैजयंती आचार्य, रो. वसुधा गावडे, महेश ढोले, शाळेचे मुख्याध्यापक मारुती ढोबळे, शाळेचे इनामदार सर व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील मुलांना ई लर्निंग संचाचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा कसा होतो आदींबाबत माहिती देण्यात आली. आदिमाया माध्यमिक विद्यालय येथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. यामध्ये एकूण १५० मुले शिक्षण घेतात.
यावेळी कार्यक्रमात बोलत असताना गावडे यांनी मुलांचे व शाळेचे कौतुक केले. ते म्हणाले की, रोज येथे मुले पाच किमीची पायपीट करून येतात पण या मुलांना अद्याप मोबाईल, व्हॉट्स अॅपचे व्यसन नसल्याने येथील मुलांची शिक्षणाची आवड, त्यांची इच्छा व स्मरण शक्ती वाखाणण्या जोगी आहे. जी शहरातील मुलांनाही मागे टाकू शकते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संचाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मुलांना शिकविण्यासाठी नवीन व आधुनिक साधन मिळाले यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्या चेह-यावर समाधान दिसत होते. अशा गरजवंत व दुर्गम भागातील मुलांना शहरातील नागरिकांनीही मदत करावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्यातर्फे करण्यात आले.