पुणे (Pclive7.com):- लोकांना मन की बात सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात मोदी सरकारने ऐकली पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, केंद्र सरकारने दाखवलेली असहिष्णूतात निषेधार्ह आहे. नवीन कृषी कायद्यांना दोन वर्ष स्थगिती म्हणजे काय हे शेतकऱ्यांना अजूनही उलघडत नाही. त्या कालावधीनंतर कायदे लागू होणार का? हा फार मोठा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचे समाधान व्हावे असा तोडगा निघावा अशी सर्वांची इच्छा आहे.
त्यांनी आंदोलनावरून होत असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. शेतकरी आंदोलनावरून होत असलेले आरोप हे हास्यापद असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. दुसरीकडे आझाद मैदानात आज (ता.२५) शेतकऱ्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत डाव्या पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता मोर्चा राजभवनकडे जाईल.
मुंबईतील मोर्चासाठी पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र आदी भागातून हे शेतकरी बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या (भाकपप्रणीत) कार्यकर्त्यांनी पोवाड्यातून सर्वांचे लक्ष वेधले. शेतकरी बांधवांच्या सत्यस्थितीवर प्रकाशझोत टाकत व अंबानी-अदानी हे उद्योगपती देश लुटत असल्याची आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीशी घालत असल्याची टीका पोवाड्यामधून करण्यात आली.