पिंपरी (Pclive7.com):- येत्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह शहराध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुण्यातील बारामती होस्टेल येथे बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या शहरातील शिष्टमंडळाने विलास लांडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, राहुल भोसले, विनोद नढे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी महापौर व नगरसेविका वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, माजी नगरसेवक अतुल शितोळे आदींसह माजी नगरसेवक उपस्थित होते. या मागणीवर पवार यांनी संपूर्ण मतदारसंघाची माहिती घेतली. शिरूर मतदारसंघाबाबत विचारपूर्वक निर्णय घेणार आहे. येत्या १४ व १५ फेब्रुवारीला पुन्हा या विषयांवर सविस्तर चर्चा करू, असे पवार यांनी शिष्टमंडळास सांगितले.