अजितदादांनी दिली पिंपरी चिंचवड मधील गणेश मंडळांना भेट
पिंपरी (Pclive7.com):- भाजपकडून मिशन बारामती मोहीम हाती घेतली असतानाच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मात्र त्याला फारसे लक्ष दिलेल नाही. त्यांचे बारामतीला स्वागत आहे अशा शब्दात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलीय. बारामतीची जनता कोणाला कौल देते ते बघू अस ही ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा पवार यांच्या हस्ते विविध गणेश मंडळांच्या गणेशाची आरती आयोजित करण्यात आलीय. त्यादरम्यान ते बोलत होते. याकूब मेमन कबर वादावर बोलताना कोणत्याही देशद्रोह्यां बाबत अशा घटना घडू नयेत असंही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटीसाठी पवार आज शहरात आले आहेत. काळेवाडी येथील श्री कृष्ण मंदिराच्या भेटीपासून दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या दौ-याला सुरुवात झाली. रात्री साडेनऊपर्यंत ते गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आदी उपस्थित होते.
काळेवाडीत पत्रकारांशी बोलताना अजितदादा पवार म्हणाले, दोन वर्ष कोरोनाच्या काळात सार्वजनिक उत्सवात कोणाला भाग घेता आला नाही.साधेपणाने सण साजरा करावे लागले. काल मुंबईतील महत्वाच्या काही गणेश मंडळांना भेटी दिल्या. आज दुपारपासून पिंपरी-चिंचवडमधील मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यातून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतात. मंडळांनाही चांगले वाटते. मला पण एक समाधान मिळते.
महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माझा दौरा नाही. आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील. मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही. हा माझा स्वभाव नाही. पिंपरी-चिंचवडने अनेक वर्ष मला अतोनात प्रेम दिले आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच या भागातूनच झाली. तेव्हापासून या सगळ्या जनतेशी माझा संबंध आहे. मी कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असले कार्यक्रम करत नसतो. मी माझ्या श्रद्धेपोटी, समाधान मिळते. कार्यकर्ते भेटतात म्हणून मी गणेशमंडळांना भेटी देत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.