पिंपरी (Pclive7.com):- शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत महिलेला पिंपरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. तिच्याकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मीरा अशोक साठे (३० रा. तिलक हाईटस्, दापोडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. संत तुकारामनगर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना यातील महिला आरोपी पवनेश्वर मंदीर परिसरात फिरत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. त्यावेळी तिच्याकडे काही दागिने मिळून आले. पोलिस तपासात महिलेकडे मिळालेले दागिने चोरीचे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने पिंपरी व देहूरोड परिसरात केलेल्या आणखी दोन गुन्ह्याची कबुली दिली.

तिच्याकडून सोन्याचे गंठण, सोन्याचे मंगळसूत्र, मोहनमाळ, झुमके, अंगठी, टॉप्स तसेच चांदीची देवीची मूर्ती, नाणी, पैंजण असा एकूण ११ लाख ५७ हजार ३८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पोलिसांनी तिची ४० हजार रुपयांची दुचाकी मोपेड देखील जप्त केली आहे. आरोपी महिलेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, पोलिस निरीक्षक रूपाली बोबडे, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.