पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने शहरातील विविध ठिकाणी डास उत्त्पत्ती स्थानांची पाहणी करून डासांच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणांच्या जागा मालकांवर आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली आहे. १ जून २०२४ पासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये १५६ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहती आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी शहरात विविध उपाययोजना करण्यात येत असून औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
डेंग्यू, चिकुणगुण्या, मलेरिया अशा किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध भागांची तपासणी करून नोटीस बजावण्याची कारवाई महापालिकेने मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या तपासणी पथकातील कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
डासोत्पत्ती ठिकाणे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई
शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम आस्थापनांवर महापालिकेचे लक्ष आहे. पाणी साठणाऱ्या भागांची तपासणी करून संबंधितांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. शिवाय अशी ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच दवाखान्यांमध्ये डेंगूच्या तपासणीकरिता आवश्यक असलेले रॅपिड किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. किटकजन्य रोग नियंञणासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरिकांच्या घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले जात आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्यासारखे रोग पसरू नयेत यासाठी महापालिकेने खबरदारी घेतली आहे. शहरातील डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधक मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी या साधनांची नियमितपणे तपासणी करणे देखील आवश्यक आहे.
– यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका