डीपीडीसीच्या बैठकीत खासदार सुळे व आमदार शेळके यांची खडाजंगी
मावळ (Pclive7.com):- मावळलाच सर्वाधिक निधी का दिला जातो, असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केल्यामुळे पुण्यात आज झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत आज जोरदार खडाजंगी झाली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सुळे यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. मावळला अधिकचा निधी मिळत असताना कोणीही खोडा घालू नये, या शब्दांत शेळके यांनी त्यांना सुनावले.

उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. या बैठकीत बोलताना खासदार सुळे यांनी त्यांच्या भाषणात ‘मावळला सर्वाधिक दिला जातो’, असा किमान पाच ते सहा वेळा उल्लेख केला. त्यामुळे आमदार शेळके संतापले. बारामतीला जास्त निधी मिळत होता, तेव्हा आम्ही कधी एका शब्दाने बोललो का, असा सवाल करीत त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना ठणकावले. आमदार शेळके यांचा रुद्रावतार पाहून आपण मावळ तालुक्याविषयी नाही तर मावळ लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत असल्याची सारवासारव खासदार सुळे यांना करावी लागली.
बैठकीतून बाहेर पडल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी प्रतिक्रिया दिली, इतर तालुक्यांनाही निधी मिळावा, अशी आमची देखील भावना आहे. परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण कोणताही खोडा घालू नये,अशी माझी विनंती आहे, असे सुनिल शेळके म्हणाले. मावळच्या विकासासाठी आपण पाठपुरावा करतो. विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करून ते मंजूर करून घेतो.आपली तळमळ बघून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मावळच्या विकासासाठी सातत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे मावळला सर्वाधिक निधी देण्याबाबत कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

आपली बांधिलकी ही मावळच्या जनतेशी आणि मावळच्या विकासाशी आहे. मावळच्या विकासाला जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी आपण यापुढेही प्रयत्न चालूच ठेवू. आम्ही अन्य तालुक्यांना निधी मिळताना कधीही विरोध केलेला नाही. मावळला अधिकचा निधी मिळत असताना कितीही मोठा नेता असला तरी त्याचा विरोध खपवून घेतला जाणार नाही, असे शेळके म्हणाले.
मावळ तालुका हा मावळ लोकसभा मतदारसंघाचाच भाग आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत देखील खासदार सुळे यांनी बोलण्याचे काहीही कारण नव्हते. ती त्यांची निव्वळ सारवासारव होती, असा टोलाही शेळके यांनी लगावला.