पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात स्थानिकांचे योगदान फार महत्त्वाचा आहे. स्थानिकांनी जागा दिल्या म्हणूनच आज ही औद्योगिक नगरी नावारूपाला आली. आता ही प्रगती थांबवायची नाही. नवनवीन उद्योगधंदे येथे आणायचे आहेत. मला खात्री आहे की, देशातच नव्हे तर देशाबाहेरही उद्योगाच्या क्षेत्रात पिंपरी चिंचवडचा परिसर एक वेगळी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट हवी, नक्कीच आपण इतिहास घडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने आज (दि.२०) पिंपरी येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे, खासदार अमोल कोल्हे, माजी गृह राज्यमंत्री किन्हाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, सुरुवातीच्या काळात पिंपरी चिंचवड म्हणजे छोटी छोटी गावे होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी टाटा कंपनी शहरात आणली. त्यानंतर बजाज कंपनीही आणली. त्यानंतर खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांती झाली. त्या पाठोपाठ हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी स्थापन झाली. आज पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. हजारो हातांना काम मिळाले. लोकसंख्या वाढत गेली म्हणून हिंजवडीत आयटी पार्क आणले. आज लाखों तरुणांना रोजगार मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात स्थानिकांचे योगदान फार महत्त्वाचा आहे. स्थानिकांनी जागा दिल्या, मानसिकता ठेवली म्हणूनच आज ही औद्योगिक नगरी नावारूपाला आली. आता ही प्रगती थांबवायची नाही. नवनवीन उद्योगधंदे येथे आणायचे आहेत. मला खात्री आहे की, देशातच नव्हे तर देशाबाहेरही उद्योगाच्या क्षेत्रात पिंपरी चिंचवडचा परिसर एक वेगळी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट हवी, नक्कीच आपण इतिहास घडवू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.