पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता संकल्प मेळावा आज रविवारी (दि.२१) काळेवाडीत होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची वैयक्तिक भेट सकाळी आठ ते दहा या वेळेत घेणार आहेत. त्यानंतर ११ वाजता कार्यकर्ता संकल्प मेळावा होणार आहे. यावेळी नवीन शहराध्यक्षही निवडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा घेण्यात येईल, त्यावेळी शहराध्यक्ष निवडण्यात येईल, असेही सांगितले होते.
शहराध्यक्ष पदासाठी दिग्गज शर्यतीत…
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, श्याम लांडे, सतीश दरेकर आदींच्या नावाची चर्चा आहे.