पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी ‘दादां’चा हात सोडत शरद पवार गटात प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी आज मेळावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा काळेवाडी येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ज्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट नसेल तर त्यांना समजावून सांगा. कोण काही येऊन सांगत असेल तर यांना फार काही शहराबद्दल जिव्हाळा आहे असं नाही, महाराष्ट्रात अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड अशीच ओळख आहे. कुणाचं कुणावाचून नडत नाही असा टोला पक्ष सोडणाऱ्यांना लगावत, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं काही करू नका. आपल्याच पक्षाकडे राहा, असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, नाना लोंढे, मोरेश्वर भोंडवे, प्रसाद शेट्टी, डब्बू आसवांनी, विनोद नढे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, संतोष कोकणे, कार्याध्यक्ष फझल शेख, युवा नेते सिद्धार्थ बनसोडे आदी उपस्थित होते.
काही घडामोडी घडल्या, ज्याचा उल्लेख विलास लांडे यांनी केला. अनेकांना पद दिली, ताकद दिली. काही जण बाहेर चे होते त्यांच्यात वाद होऊ दिला नाही. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही. अरे मी कसा बोलू देणार नाही. काय घडलं, काय नाही याच्या खोलात जात नाही, आम्ही कोणाचाही अनादर करणारे लोक नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.
नवीन शहराध्यक्ष पदाचा निर्णय लवकरच..
अजित गव्हाणे यांनी साथ सोडल्यामुळे रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदाबाबत आज अजित दादा पवार यांनी चाचपणी केली. सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केली. शहराध्यक्ष पदाकरिता अनेक जण इच्छुक आहेत. लवकरच त्याबाबत निर्णय घेणार असून नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात येईल. त्यात सर्व जाती धर्माचा समावेश करण्यात येईल असे अजित पवार म्हणाले.