पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क, फ, ई या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा १९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमीदाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्र आणि तळवडे नदीजल उपसा केंद्र या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या भोसरी RS2 सबस्टेशन येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने १९ सप्टेंबर रोजीचा वीजपुरवठा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे क फ आणि ई या क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा सकाळी नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा, आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.