पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात शरदचंद्र पवार यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. तीनही विधानसभेत पक्षाचे उमेदवार मोठ्या ताकदीने विजयी होऊ शकतात. शहरात शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन व्यापक आणि सर्वसमावेश वाढलेले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात ठराव बैठक झाली. सदर बैठकीत शहरातील तीनही विधानसभा पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने लढाव्यात व निष्ठावंतांना प्रथम प्राधान्याने उमेदवारी देण्यात यावी असा सर्व प्रमुख शहर पदाधिकारी, सेल, फ्रंटल प्रमुख, पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमताने ठराव मंजूर केला.
सदर ठराव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्ष संसदीय मंडळाला ठराव प्रत देण्यात येणार आहे. यावेळी शहरातील सर्व मुख्य कार्यकारणी पदाधिकारी, सेल, फ्रंटल प्रमुख, पिंपरी चिंचवड, भोसरी विधानसभा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. चिंचवड मतदार संघातून शहराध्यक्ष तुषार कामठे, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, पिंपरी मतदार संघातून माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत धर, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, सामाजिक न्याय विभाग प्रमुख मयूर जाधव, सचिन गायकवाड आणि भोसरी विधानसभेतून माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, दत्ता जगताप हे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक असून सदर उमेदवारांचे नावे पाठवण्यात येणार आहेत.
सदर बैठकीत पक्षाचे प्रदेश सचिव प्रशांत सपकाळ, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, कार्याध्यक्ष विशाल काळभोर, कार्याध्यक्ष संतोष कवडे, काशिनाथ जगताप (वरिष्ठ उपाध्यक्ष), वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, सूचक इम्रान शेख (युवक अध्यक्ष), अनुमोदक ज्योती निंबाळकर (महिलाध्यक्ष), राहुल आहेर (विद्यार्थी शहर अध्यक्ष), अरुण थोपटे (सेवादल अध्यक्ष), विशाल जाधव (ओबीसी विभाग अध्यक्ष), मयुर जाधव (सामाजिक व न्याय विभाग अध्यक्ष), अल्ताफ शेख (अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष), शाऊल कांबळे (ख्रिश्चन सेल अध्यक्ष), विजयकुमार कालिदास पिरंगुटे (व्यापारी व उदयोग व्यापार सेल), डॉ. सुनिल चव्हाण (वैदयकीय सेल अध्यक्ष), राहुल गोडसे (आयटी सेल अध्यक्ष), अॅड. संतोष शिंदे (लीगल सेल अध्यक्ष), गणेश काळे (झोपडपट्टी सेल अध्यक्ष ), कैलास बनसोडे (सरचिटणीस ), अधिकराव चव्हाण (सचिव शहर), वंदना दीपक आराख (अध्यक्ष असंघटित घरेलू कामगार), संजय पडवळ (अध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती) व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अडचणीच्या काळात पक्षात जे न डगमगता पक्षासाठी प्रामाणिकपणे शरद पवार साहेबांबरोबर राहिले, त्यांचाच प्रथम प्राधान्याने विचार पक्ष करेल. आणि निष्ठावंत उमेदवाराला नक्कीच संधी मिळेल आणि तो विजयी होईल याची आम्हाला शाश्वती आहे. पक्ष संघटनेची संपुर्ण ताकद उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यरत राहील. शहरातील तीनही मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाकडे असावे हि आमची आग्रही मागणी आहे.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, शरदचंद्र पवार साहेब हे दूरदृष्टीचे नेते असून ते नक्कीच आम्हा निष्ठावंतांना न्याय देतील. आमचे शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे हे आमच्या शहर पक्ष संघटनेचे पालक असून त्यांचे मार्गदर्शन आम्हाला आहे. आम्ही सर्व पक्षातील आघाडी, सेल त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत.
महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी. या ठरावानुसार ज्या उमेदवाराला संधी मिळेल त्यांचा पक्ष संघटना म्हणून आम्ही शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात पूर्ण तयारीने काम करू.