पिंपरी (Pclive7.com):- मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर “मतदान अवश्य करा” असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले असून शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत महापालिका विविध उपक्रम राबवीत असून मतदार जनजागृतीसाठी महापालिकेने शहरात प्रवास करणाऱ्या सुमारे १ हजार ऑटोरिक्षांवर मतदानाचे संदेश फलक लावले आहेत. या मतदार जनजागृतीपर संदेश फलकांची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
रविवारी निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या रिक्षाद्वारे करण्यात येणा-या मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे,कार्यकारी अभियंता राजीव घुले, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, मनोज माचरे, प्रिन्स सिंह , महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.