सांगवी (Pclive7.com):- पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. सांगवी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जुनी सांगवी येथे ही कारवाई केली. रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २३, रा. शितोळे चाळ, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी सांगवी येथील वसंत दादा पुतळ्यासमोरील विसर्जन घाटाजवळ एकजण पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार विवेक गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणात आरोपीवर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती काढून त्याचे संबंध कोणत्या मोठ्या टोळीशी आहेत का, याबाबत सांगवी पोलीस तपास करत आहेत. आरोपी सराईत असून आहे. त्याच्यावर या सांगवी पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते, सुरेश हिंगे, सहायक फौजदार शशीकांत वाघुले, पोलीस हवालदार प्रकाश शिंदे, सचिन ढवळे, विवेक गायकवाड, प्रमोद गोडे, प्रविण पाटील व पोलीस शिपाई सुहास डंगारे यांनी केली.

























Join Our Whatsapp Group