वाकड (Pclive7.com):- वाकडमधील ४५ मीटर रस्ता रुंदीकरण कारवाईत बेघर झालेल्या नागरिकांना घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्यांना पंतप्रधान आवास योजना, घरकुल, म्हाडा या ठिकाणी शासन स्तरावर राहण्यासाठी स्वतःचे घर मिळावे त्यासाठी सरकारने तातडीने मदत केली पाहिजे. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, अशी आग्रही मागणी रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, वाकड मधील ४५ मी. दत्त मंदिर मेन रोडचे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मागील चार ते पाच दिवसांपासून या रस्त्यांवरील नागरिकांची बांधकामे महापालिकेच्या वतीने कारवाई करून हटवण्यात आली आहे. रस्त्याचे डीपी प्लॅननुसार रुंदीकरण केल्यामुळे वाकड मधील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शहराचा, प्रभागाचा विकास होणे गरजेचा आहे.
परंतु या ठिकाणी काही नागरिकांची घरे ही रुंदीकरणात पूर्णपणे बाधित झाली असून या कारवाईमुळे गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे विकासाबरोबर सामान्य बाधित नागरिकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तसेच ज्या नागरिकांची जमीन रस्त्यामुळे बाधित झाली आहे त्यांना महानगरपालिकेकडून त्याचा योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आपण या सर्वबाबींचा सकारात्मक विचार करून सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी स्नेहा कलाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
बिल्डरांना वेगळा न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय का ?
वाकड डांगे चौक रस्ता प्रस्तावित करताना अनेक ठिकाणी रस्त्याची अलायमेंट (रुंदी) मध्ये तफावत करण्यात आली आहे. या रस्त्यावर ज्या बिल्डरला ३० मीटरच्या निश्चितीनुसार बांधकाम परवानगी दिली त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मात्र ४५ मीटरची बांधकाम देखील पाडण्यात आली. अधिकाऱ्यांकडून असा दुजाभाव का ? असा सवाल भाजपचे प्रभारी संतोष कलाटे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या कारवाईत अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. त्यांच्या राहण्याची तातडीने व्यवस्था व्हावी. त्यांना हक्काचे घर देण्यात यावे. ज्या नागरिकांची जमीन रस्त्यामुळे गेली आहे. त्यांना तातडीने मोबदला दिला गेला पाहिजे.
– स्नेहा कलाटे, अध्यक्षा, रणजित आबा कलाटे फाउंडेशन.

























Join Our Whatsapp Group