पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी प्रभागात पाण्याचे नियोजन होत नसल्याने पाणी पुरवठा अधिकाऱ्यालाच काळे फासले. सुशिलकुमार लवटे असे या अधिकाऱ्याचे नावे असून महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयात कनिष्ट अभियंता म्हणून लवटे कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये जावेद शेख यांच्या आकुर्डी येथील संपर्क कार्यालयाजवळ ही घटना घडली.
गेल्या वर्षभरापासून प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असतानाही “आठ दिवसात काम होईल, अजून दोन दिवस द्या, साहेब, तुमचेच काम सुरु आहे”. असे म्हणत अधिकारी वेळ मारून नेत होते. महापालिकेचा कर भरूनही पाणी मिळत नसल्याने पाणी टंचाई संदर्भात जावेद शेख यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बैठक घेण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी उपस्थित कार्यकारी अधिकारी कांबळे, उपअभियंता राणे, कनिष्ठ अभियंता सुशिलकुमार लवटे आदींना चांगलेच धारेवर धरले.
गेल्या वर्षभरापासून शहरातील काही भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे वारंवार पाण्याच्या नियोजनाबाबतीत चर्चा करूनही नगरसेवकांच्या सुचना ऐकूण याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचा संताप व्यक्त करत नगरसेवक शेख यांनी अधिकाऱ्याला काळे फासले. यापुढेही अधिकारी जुमानत नसतील तर महापालिका आणि अ प्रभाग कार्यालयात घुसून काम बंद पाडू, असा इशारा शेख यांनी दिला आहे. यावेळी, सय्यद इखलास, तोहित शेख, वसंत सोनार, हरिभाऊ हांडे, बयाजी तोरणे यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.