पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेत हस्तक्षेप नको – स्थानिकांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा ३४० वा सालाबादप्रमाणे सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिनांक १८ जून २०२५ रोजी देहू गाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारी ही पालखी १९ जून रोजी निगडी गावठाण येथे पोहोचणार आहे. मात्र, निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे पालखी मार्गात बदल सुचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याने स्थानिक नागरिकांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. “संत तुकाराम महाराज पालखी मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. ही आमच्या अस्मितेची गोष्ट आहे.”या बदलाविरोधात भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रशासनाला आंदोलनाचा ठाम इशारा दिला आहे.

📌 परंपरेत हस्तक्षेप?
भक्ती शक्ती उड्डाणपूल परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे, पालखी मार्ग बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व शहर पोलिस विभागाने संयुक्त बैठक घेऊन भक्ती शक्ती उड्डाणपुलाऐवजी श्रीकृष्ण मंदिर बाजूने पालखी वळवण्याची शक्यता दर्शवली आहे. एकीकडे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा भक्तीभाव आणि आध्यात्मिक उत्सव सुरू होतोय, तर दुसरीकडे प्रशासनाच्या निर्णयामुळे स्थानिकांची भावना दुखावली गेली आहे. संतांच्या पालखीची परंपरा, मार्ग आणि श्रद्धा यांची जपणूक करणे ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, निगडी गावठाण, मारुती मंदिर, आणि बस स्टॉप ह्या पारंपरिक पालखी मार्गावरूनच पालखी यावी, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

🙏 पिढ्यांपासून चालत आलेली श्रद्धा आणि परंपरा
निगडी गावठाणातील मारुती मंदिर हे पालखीचे निवारा स्थळ असून, त्यानंतर पालखी निगडी बस स्टॉपमार्गे आकुर्डी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होते. हा मार्ग शेकडो वर्षांची परंपरा असून, या मार्गावर दरवर्षी वारकऱ्यांसाठी अन्नदान, सेवा, स्वागताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

⚠️ भावनांवर आघात
स्थानिक नागरिक, मंडळे, व वारकरी बांधवांच्या मते पालखीचे दर्शन घेण्यासाठी निगडीकरांची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. भाविकांचे धार्मिक, भावनिक जुने संबंध या मार्गाशी जोडलेले आहेत. प्रशासनाने काम सुरू असतानाही नियोजन करणे गरजेचे आहे, मार्ग बदलणे हे उपाय नव्हे..!
👥 नागरिकांची मागणी
मुळ मार्ग कायम ठेवावा – भक्ती शक्ती उड्डाणपूल > निगडी गावठाण > मारुती मंदिर > निगडी बस स्टॉप > आकुर्डी विठ्ठल मंदिर
प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेने काम सुरळीत पार पाडावे.
वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा.
लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करावी.
