पिंपरी (Pclive7.com):- चिखलीतील साहिल पुरम सोसायटी येथे रात्री भीषण आग लागून चार दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिखली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री २.५५ वाजण्याच्या सुमारास साहिल पुरम सोसायटी सेक्टर १६ राजे शिवाजीनगर, जाधववाडी, चिखली येथे दुचाकींना भीषण आग लागली असल्याची वर्दी मिळाली होती. त्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग काही मिनिटांत आटोक्यात आणली. मात्र तत्पूर्वीच चार दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. या आगीची झळ आणखी पाच ते सहा गाड्यांना पोचली असून त्यांचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याआगीत पाच ते सहा लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.