
पुणे (Pclive7.com):- पुणे शहराच्या मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात गुरुवारी (दि.२७) सायंकाळी एका तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. भाऊ रंगारी मार्गावरील पांडुरंग इमारतीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

मानसी भगवान गोपालघरे (वय २०, रा. पांडुरंग इमारत, बुधवार पेठ) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचे लग्न झाले होते. ती मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळी तपास करताना पोलिसांना मानसीने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. या चिठ्ठीत तिने कोणालाही दोषी न ठरवता, स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवित असल्याचे लिहिले आहे. “मी घरातील लोकांसाठी योग्य नाही. मला कामाचा कंटाळा आला आहे, त्यामुळे स्वतःहून हे पाऊल उचलत आहे,” असा उल्लेख तिच्या पत्रात आढळला आहे.

यातून तिच्यावर असलेला मानसिक ताण आणि कामाचा दबाव आत्महत्येचे मुख्य कारण असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, तिने कोणत्या प्रकारचे काम करत होती? तिला कामाच्या ठिकाणी काही अडचणी किंवा त्रास होता का? याबद्दल पोलिस अधिक तपास करणार आहेत.


























Join Our Whatsapp Group