पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी रिक्षा चालकाकडून ४०० रुपयांच्या लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलिस अंमलदार वर्षा विठ्ठल कांबळे (३५) व ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (२८) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हा रिक्षाचालक असून तो पिंपरी, मोरवाडी, केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करतो. दि. १७ नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी वाहतूक केल्याच्या कारणावरून महिला पोलिस अंमलदार वर्षा कांबळे व ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदार रिक्षा चालकाकडून ३०० रुपये घेतले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा अडवून दरमहा ‘हफ्ता’ म्हणून ५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता आरोपींनी ४०० रुपयांच्या लाचेची मागणी स्पष्ट झाली. त्यानुसार शनिवारी केएसबी चौकात सापळा रचण्यात आला. यावेळी ट्रॅफिक वॉर्डन गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून ४०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस शिपाई कांबळे हिलाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केली.

























Join Our Whatsapp Group