पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या कामामुळे मुंबई–पुणे महामार्गावरील निगडी बस स्टॉपजवळ पाईपलाइन फुटण्याच्या घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. मेट्रो पिलरच्या शेजारील पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले, तसेच तात्पुरता उपाय म्हणून ठिकाणी दगड ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एक ते दीड वर्षात चार ते पाच वेळा याच परिसरात पाईपलाइन फुटून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. पाण्यासारख्या महत्त्वाच्या संसाधनाचा असा वारंवार अपव्यय होत असूनही मेट्रो प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य दखल घेत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “पाईपलाइन फुटीच्या वारंवार होणाऱ्या घटनांकडे ना मेट्रो रेल्वे अधिकारी लक्ष देत आहेत, ना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली आहे. मेट्रो ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा, जेणेकरून असा निष्काळजीपणा पुन्हा होणार नाही,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही तात्काळ उपाययोजना आणि कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी केली असून, पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण व्यक्त केले आहे.

























Join Our Whatsapp Group