पिंपरी (Pclive7.com):- पवना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाकडून व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने केजुदेवी बंधारा, थेरगाव येथे नदीच्या पाण्यावर फेस दिसून आल्यानंतर त्वरित ताथवडे, पुनावळे, वाल्हेकरवाडी व रावेत परिसरात उपद्रव शोध पथकांमार्फत सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.

सदर सर्वेक्षणात नदीप्रदूषणास कारणीभूत असलेल्या अनधिकृत व नियमबाह्यरित्या चालणाऱ्या लघुउद्योग व आस्थापनांची माहिती गोळा केली जात असून दोषींवर कठोर कारवाईची अंमलबजावणी सुरू आहे. अद्यापपर्यंत दिनांक २२/११/२०२५ रोजी वाल्हेकरवाडी येथील रुक्साना ड्रायक्लीनर्स ही कंपनी सिल करणेत आली आहे.

यापूर्वीच्या सर्वेक्षणात ताथवडे व वाल्हेकरवाडी परिसरात दोन लॉन्ड्री/ड्रायक्लीनिंग आस्थापना नदी प्रदूषणास कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले असता सदर आस्थापना सील करण्यात आल्या असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच अद्यापपर्यंत उपद्रव शोध पथक मार्फत रावेत, काळेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात पवना नदी पात्रात अवैध भराव करत असल्याचे निदर्शनास आले असता ८ जागामालक व ३ वाहनचालकांवर उपद्रव शोध पथकाने गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नदीपात्रात भराव करणाऱ्या वाहनांवर आतापर्यंत अंदाजे ३० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

पर्यावरण विभागाच्या वतीने चालू असलेल्या या मोहिमेबद्दल अधिक माहिती देत त्यांनी सांगितले “पिंपरी चिंचवड महापालिकेने उपद्रव शोध पथकांमार्फत सखोल सर्वेक्षण सुरू असून प्रदूषणास जबाबदार व्यक्ती किंवा आस्थापनांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. नियमबाह्यरीत्या सांडपाणी किंवा कचरा नदीपात्रात सोडणाऱ्या आस्थापनांना दंड ठोठावणे, त्यांच्या युनिट्स सील करणे आणि गुन्हे दाखल करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. पुढील काळात आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून पर्यावरण विभाग प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

























Join Our Whatsapp Group