पुणे (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून देशभर बेरोजगार युवक युवतींसाठी किमान कौशल्य आधारीत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील बेरोजगारांना याप्रशिक्षणातून रोजगार व उत्पन्न वाढीसाठी मदत होत आहे. त्याअंतर्गतच वारजे मधील ॲस्पिरिफाय संस्थेच्या वतीने चालविण्यात आलेल्या लाइट हाउस प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी ६०० बेरोजगार, अल्पशिक्षित तरुणांना आपल्या आवडीनुसार विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि नोकरी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येते. त्याचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा व आर्थिक सक्षम होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री गिरीष बापट यांनी येथे केले.
पुणे, वारजे येथे ॲस्पिरिफाय संस्था, पुणे महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या लाइट हाउस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार भीमराव तापकीर, पक्षनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, ॲस्पिरिफाय कंपनीचे संचालक श्रीचंद आसवानी, सुजय कालेले, नगरसेवक राजाभाऊ बराटे, दीपक पोटे, सुशिल मेंगडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, छाया मारणे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, देशभर बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार याबाबत अनेक ठोस पावले उचलत आहे. ॲस्पिरिफाय संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या लाइट हाउस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेले युवक सक्षमपणे आपल्या पायावर उभे राहतील आणि लाइट हाउस हे आजच्या बेरोजगार तरुण – तरुणांसाठी एक उत्पन्नाचे मार्गदर्शन केंद्र बनेल असा मला विश्वास आहे. असेही बापट म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंतनु खिलारे तर आभार श्रीनाथ भिमाले यांनी मानले.