पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मिळकत कर पुर्णत: माफ करण्याबाबतची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौरांकडे नुकतीच केली आहे. मात्र त्या निर्णयाचा लाभ शहरातील अतिअल्प मिळकतधारकांना होणार आहे. म्हणून ५०० ऐवजी ७०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णत: माफ करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे केली आहे.
मारूती भापकर यांनी लक्ष्मण जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन दिले होते. या संदर्भातील ठराव मुंबई महापालिकेने संमत करून राज्यसरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र तो मंजूर करण्यात आलेला नाही. याची आठवण काल विधानसभेतील चर्चेत बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली. तर दुसरीकडे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ७०० चौरस फुटापर्यंत कर माफ करण्याची मागणी विधानसभेत केली होती, याचीही आठवण करून देण्यात आली. यावर भाजपच्या आमदाराची मागणी उचलून धरत मुंबईतील ७०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुंबई महापालिकेने या संदर्भातील वैधानिक कार्यवाही करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा अशी सूचना त्यांनी केली. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे त्यांना हे शक्य आहे मात्र इतर महापालिकांना ते शक्य नाही असे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळात सांगितले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची पूर्ण सत्ता आहे. या महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे ५ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. गेली अडीच वर्ष स्वच्छ, पारदर्शक काम भाजपा व प्रशासनाने इथे केले आहे. सत्ता राबवीत असताना ३१ मार्च नंतरची ठेकेदारांची बिले अडवून महापालिकेचे ३०० कोटी वाचवले आहेत. त्याबाबत शहरात येवून मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्वांना शाब्बासकी ही देऊन गेले आहेत. तसेच त्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या ठेवी अल्प मुदतीच्या ठेवींमध्ये ठेवायला सुरुवात केली. आणि अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० कोटी जादा व्याज महापालिकेला मिळाले. या आर्थिक वर्षात १०० कोटी निव्वळ व्याजापोटी मिळतील असा दावा महापालिकेने केला होता. म्हणजे ठेकेदारांची बिले अडवल्यामुळे प्रतिवर्षी ३०० कोटी प्रमाणे ५ वर्षाची दिड हजार कोटी व अल्प मुदतीच्या ठेवीच्या व्याजापोटी प्रति वर्षी १०० कोटी म्हणजे पाच वर्षाची ५०० कोटी अशी एकूण तब्बल २ हजार कोटी रुपये वाचविण्याचा विक्रम पिंपरी चिंचवड महापालिका करणार आहे.
त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांची आर्थिक स्थिती काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही. परंतु तुमच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे ५ वर्षात २ हजार कोटी महापालिकेचे वाचणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका सभेत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील ७०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव ठेवून, सर्वानुमते मंजूर करून तो राज्य सरकारकडे मंजुरी साठी पाठवावा. अशी मागणी यापूर्वी १५ मार्च २०१८ रोजी महापौर, सत्तारुढ पक्षनेते, सभापती स्थायी समिती, विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेते यांना लेखी पत्र देऊन केली होती.
आता नुकतीच आमदार जगताप यांनी शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पुर्णत: माफ करणेबाबतची मागणी महापौरांकडे केली आहे. त्यांच्या या जनहिताच्या मागणीचे आम्ही स्वागत करतो. मात्र ५०० चौरस फुटापर्यंतचा मिळकत कर माफ करण्याच्या निर्णयाचा लाभ शहरातील अतिअल्प मिळकत धारकांना होणार आहे. म्हणून शहरातील ५०० ऐवजी ७०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पुर्णत: माफ व्हावा. यासाठी लक्ष घालून पाठपूरावा करावा व शहरवाशींना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी मागणी मारूती भापकर यांनी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे.