पिंपरी (Pclive7.com):- भावी खासदार.. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा बापमाणूस.. पैलवान घडवणारे वस्ताद.. अशा आशयाचे फ्लेक्स माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीसह पंचक्रोषित झळकले आहेत. लोकसभा निवडणुक तोंडावर आहे. अशातच राज्यात चर्चेत राहिलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आता काही वेगळी राजकीय समीकरण दिसणार का? असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्याच कारण ठरलंय भोसरीमध्ये लागलेले हे पोस्टर्स.. त्यामुळे विलास लांडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या शक्तीप्रदर्शनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर भावी खासदार लिहिण्यात आलं आहे आणि तसेच संसदेचा फोटोही पाहायला मिळत आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील माजी आमदार विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मागच्या वेळीही विलास लांडेनी मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. मात्र ऐनवेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती.
अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आहेत. मध्यंतरी अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा होत होती. अशातच आता राष्ट्रवादीचाच नेता त्यांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहेत.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं खासदारकीची उमेदवारी कुणाला देणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. पण सध्या तरी विलास लांडे यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघ आधीपासूनच चर्चेत आहे. अमोल कोल्हे नाराज असल्याचं बोललं जात असतानाच विलास लांडे यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.