केदार शिंदे, भरत जाधव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पिंपरी (Pclive7.com):- मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि रंगभूमीवर विविध विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाला २१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या नाटकातील कलावंतांचा सत्कार व त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम बुधवारी (१६ ऑगस्ट) चिंचवडला होणार आहे.
चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात बुधवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केदार शिंदे, भरत जाधव यांच्यासह जयराज नायर, मनोज टाकणे, प्रशांत विचारे या नाटकातील कलावंतांची मुलाखत प्रसिध्द अभिनेते संकर्षण कऱ्हाडे घेणार आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कलावंतांचे सत्कार होणार आहेत.
१५ ऑगस्ट २००२ रोजी ‘सही रे सही’ या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून गेली २१ वर्षे ‘सही रे सही’ नाटकाला प्रेक्षकांचा सातत्याने हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे. जवळपास चार हजार प्रयोगसंख्येकडे या नाटकाची वाटचाल सुरू आहे. अशा या लोकप्रिय नाटकाशी संबंधित विविध किस्से, अनुभव यावर आधारित दिलखुलास गप्पा होणार आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपणं भारी देवा’ या महिलाप्रधान चित्रपटाला सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने एका महिन्यात तिकीट खिडकीवर जवळपास ७१ कोटी रूपये उत्पन्न मिळवले आहे. मराठी चित्रपटाला अभावाने मिळणाऱ्या अशा यशाबद्दल केदार शिंदे यांचा विशेष सत्कार होणार आहे. तसेच, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, पीएमपीचे सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे, सांगवी नाट्यगृहाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक राजू ढोरे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार होणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येईल, त्यास प्राधान्य राहणार आहे. काही जागा राखीव असतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले आणि उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी दिली आहे.
Tags: केदार शिंदेचिंचवडदिलखुलास गप्पांचा कार्यक्रमदिशा सोशल फाऊंडेशनपुन्हा सही रे सहीभरत जाधवसही रे सही