पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांच्या नियुक्तीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी जारी केला आहे.

नवीन आकृतीबंधानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली आहे. सध्या महापालिकेत राज्य सेवेतील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत.
महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२१ पासून अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पाठविलेला प्रस्ताव आणि शासन स्तरावरील समितीची शिफारस विचारत घेऊन जगताप यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवडीने पदस्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली. महापालिका आस्थापनेवरील पात्र एकमेव अधिकारी असल्याने जगताप यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे.