पिंपरी (Pclive7.com):- मावळातील सोमवडी वाडी, कातकर वस्ती आणि गोळेवाडी आंबी येथील कलाश्रम प्रकल्प येथे मोशी-चिखली आणि किवळे-रावेत येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने कातकरी आदिवासी आणि निराधार मुलांसोबत दिपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलच्या संस्थापक संचालिका कमला बिष्ट, संचालक डॉ. संजय सिंग, डॉ. अजित थिटे, प्रचितीचे संचालक श्री. प्रशांत पाटील, श्री. विजय शिर्के, प्रा. महादेव वाघमारे, प्राचार्या दिपाली तनपुरे, श्री. रवी पोटफोडे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
दिवाळी उत्सवा दरम्यान मुलांना शैक्षणिक साहित्य, बॅग, टिफिन बॉक्स यासह फराळ, कपडे, फटाके तसेच आदिवासी कातकरी नागरिकांना विविध गृहोपयोगी वस्तूं कपडे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुलभूत गरजांसाठी सतत धडपडणाऱ्या आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
आदिवासी जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल प्रयत्नशील आहे. दिवाळीचा आनंद प्रत्येकजण आपल्यापरीने साजरा करीत असतो. प्रकाशाच्या या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे कोंदण देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. असल्याचे डॉ. संजय सिंग यांनी सांगितले.
मोशी चिखली आणि किवळे रावेत येथील दोनही इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने मावळातील सोमवडी वाडी आदिवासीं कातकरी वस्ती आणि गोळेवाडी आंबी येथील केअरिंग हॅन्डस संचालित कलाश्रम प्रकल्प येथे दिवाळी साजरी करून एक नवी वाट निर्माण केली आहे.
दिवाळी हा सण समाजातील सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु अशा या आनंदाचा सोहळ्यात आदिवासी बांधव मात्र आपले पोट भरण्यातच व्यस्त असतात. त्यांच्यासोबत दिपावली साजरी करून आम्ही त्यांच्या आनंदात सहभागी झालो याचा आम्हाला आनंद होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या उपक्रमाबाबत संचालिका कमला बिष्ट म्हणाल्या की, आज देशात एकीकडे विकासाच्या शिखरावर पोहचलेली जनता दिसत असताना दुसरीकडे या सर्व गोष्टी पासून कोसो दूर असलेली आदिवासी कातकरी मुले आणि निराधार मुले प्रत्येक दिवसासाठी झगडत आहेत. इतरांप्रमाणेच त्यांचे देखील आयुष्य दिपावली सणाच्या प्रकाशाने उजळून निघावे, दैनंदिन कणखर असे आयुष्य विसरून चार क्षण आनंदाचे – उत्साहाचे घालविता यावे, या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून दिपावली साजरी करण्यात आली.
कातकरी महिला श्रीमती पार्वती बाई मुकने यांनी सरकारी मदत येते पण पुरेसे वाटप आमच्या पर्यंत पोचत नाही. या खंदरा बंदरात बिगारी काम करुन पैसे मिळवायचे आणि पोट भरायचे. त्यातनं आमच्या पोरांना कधी पेन मिळतो तर पेन्सिल नसते आणि कधी पेन्सिल असते तर वही नसते. असे सांगितल्यावर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक भावूक झाले. सर्व आदिवासींनी शाळेचे आभार मानले.
प्रसंगी, इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील याठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले. आई-वडीलांकडे हटट करून हवी ती गोष्ट मागण्यासाठी आम्ही भांडत असतो. परंतु, कमीत-कमी गोष्टींपासून देखील आनंद मिळतो, हे आज पाहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेश मधून कायद्याचा अभ्यास शिकण्यास आलेल्या ईशा सिंग यांनी अशा प्रकारे दिवाळी साजरी केल्याचा पहिला अनुभव असल्याचे सांगीतले.