पिंपरी (Pclive7.com):– भोसरी येथील सेक्टर १२ मधील १० एकर जागेवर संगणक प्रशिक्षण, संशोधन, विकास आणि शैक्षणिक सुविधांचा मोठा विस्तार करण्यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी दिली.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), पुणे यांचे वतीने भोसरी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या जागेवर अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी सहसचिव संकेत भोंडवे यांनी आज केली त्यावेळी ते बोलत होते.
निवृत्त कर्नल तसेच कार्यकारी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे संचालक ए.के. नाथ आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहर अभियंता मकरंद निकम,उप आयुक्त रविकिरण घोडके,आण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पुणे येथील सी-डॅकचे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातील या वेगाने विकसित होणाऱ्या टाउनशिपमध्ये ही जमीन धोरणात्मकदृष्ट्या सुरक्षित असणार आहे. विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एक सर्वसमावेशक शैक्षणिक सुविधेची स्थापना केली जाणार आहे. या अत्याधुनिक सुविधेमध्ये व्हीएलएसआय, एचपीसी, बिग डेटा, एआय इत्यादी सारख्या विशिष्ट आणि उच्च श्रेणीतील तंत्रज्ञान क्षेत्रात विविध सी-डॅक आयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या विकासामुळे सी-डॅकचा विस्तार होण्यास मदत मिळेल तसेच उच्च श्रेणीतील कौशल्य विकास क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल. सध्या, सी-डॅक ऍडव्हान्स कंप्युटींग ट्रेनिंग स्कुल (ऍक्ट्स), पुणे येथे ६५० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रचंड मागणीमुळे ही क्षमता आता १ हजार ते १ हजार २०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानंतरच्या टप्प्यात, सी-डॅकने उच्च श्रेणीतील डेटासेंटर्ससह अत्याधुनिक संशोधन आणि विकास सुविधा स्थापन करण्याची योजना आखली आहे. ज्यात स्वदेशी उच्च-कार्यक्षम संगणक सुविधा देण्यात येणार आहे. या सुविधेमध्ये नेक्स्ट-जनरेशन सुपर कॉम्प्युटर्स, इंटरकनेक्ट्स आणि संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी समर्पित प्रगत आर ऍन्ड डी लॅबचा समावेश असणार आहे.
चिखलीमध्ये प्रगत शैक्षणिक आणि संशोधन सुविधांची स्थापना ही सी-डॅकच्या तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्टतेसाठी चालू असलेल्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे.
उभारण्यात येणा-या इमारतीमध्येअत्याधुनिक वास्तुरचना, वायुवीजन, सुसज्ज वाहनतळ, हेलिपॅड, ड्रोनपॅड, सोलर सिस्टीम, पर्यावरणपूरक परिसर आदी सुविधांचा समावेश असणार आहेत. हा उपक्रम उच्च-स्तरीय शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक संशोधनाच्या संधी प्रदान करतो जो देशाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी सांगितले.