पुणे (Pclive7.com):- ज्येष्ठ मल्ल गणपतराव आंदळकर यांचे पुण्यातील जोशी रुग्णालयात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. १९६० साली त्यांनी हिंदकेसरी पुरस्कार पटकावला होता तर १९६४ साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीचीपंढरी अशी निर्माण केली होती. देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. त्यामुळे जवळच्याच पुनवत गावातील गणपतराव आंदळकर कोल्हापुरात येणे स्वाभाविक होते. दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. १९६४ साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. आंदळकरांच्या उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते, ते कोल्हापुरात सराव करूनच.
आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लांबरोबरच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात रहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात. गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. महान भारत केसरी रूस्तम-ए-हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या नामवंत मल्लांना त्यांनी कुस्तीचे धडे दिले आहेत.






















Join Our Whatsapp Group