पिंपरी (Pclive7.com):- जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरूवारी (दि. १४) केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून सर्व कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. म्हणूनच पिंपळे सौदागर येथील शिवराज काटे स्पोर्टस् फाऊंडेशन आयोजित ‘आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या स्पर्धेचे आयोजक शिवराज काटे म्हणाले की, पिंपळेसौदागर येथील शिवराज काटे स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक’ २०१९ भव्य हाफ पिच लॉन टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्यात ३९ जवान शहिद झाले आहेत. त्यांना श्रध्दांजली म्हणून ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेची बक्षिसाची रक्कम शिवराज काटे स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीनेया हल्ल्यातील शहिदांच्या कुटूंबियांना देण्यात येणार आहे.