पिंपरी (Pclive7.com):- रावण साम्राज्य टोळीतील फरार असलेला सराईत गुन्हेगार अविनाश जाधव उर्फ सोन्या (वय २६, रा. जाधव वस्ती, रावेत) याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या आहेत. चिंचवड स्टेशन येथे सापळा रचून पोलीसांनी त्याला अटक केलीे आहे. गुन्हे शाखा, युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ एप्रिल १८ रोजी आरोपी अविनाश आणि त्याचे सहा साथीदार वाकड येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच हा दरोड्याचा डाव उधळून लावत काळेवाडीत त्यांना पकडले होते. या कारवाई दरम्यान अविनाश तेथून फरार होण्यात यशस्वी झाला होता. तर पोलिसांनी अटक केलेल्या सहाजणांकडून तीन गावठी पिस्तूल जप्त केल्या होत्या. तेव्हापासून अविनाश फरार होता, पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, पोलीस नाईक सावन राठोड यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, फरार आरोपी अविनाश जाधव चिंचवड स्टेशन येथील मल्हार पान दुकानासमोर थांबला आहे. तेव्हा गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अविनाश याला अटक केली. अविनाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, सावन राठोड, हमेंद्र तातळे, सचिन मोरे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.