पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भोसरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात ३ महिलांची सुटका पोलिसांनी केली आहे. ही कारवाई मंगळवारी दि.७ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास दापोडी येथील मंत्री निकेतन येथे करण्यात आली.
रेणू रमेश भाटिया (वय ६३, रा. दापोडी), पेप सिंह शेतान सिंह (वय २५, रा. दापोडी मुळ राजस्थान), रमेश शिवाजी सुर्यवंशी (वय २७, रा. थेरगाव, मूळ गाव लातूर), बंडू उत्तम चव्हाण (वय ३५, रा. रहाटणी, मूळ गाव बीड), मारूती बळीराम शिंदे (वय ३५, रा. रहाटणी, मूळ गाव बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील मंत्री निकेतन येथे एका घरामध्ये वरील आरोपी तीन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असत. तसेच ग्राहकांकडून मिळणारे पैसे स्वतःच्या फायद्याकरता घेऊन त्यावर आपली उपजीविका चालवत असत. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी हा डाव उधळून लावला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार असून भोसरी पोलिस पुढील तपास करत आहेत.