पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीतील राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील कार्यरत असलेल्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयी प्रचंड तक्रारी आहेत. यामुळे शिंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षण विभाग यांना पत्र पाठवण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे चालू शैक्षणिक वर्षात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पासून वंचित राहावे लागले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात नाही. शिक्षण समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने प्रशासनाकडून कामकाज सुरू आहे.
प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शिक्षणाधिकारी म्हणून बढती देताना कोणते निकष लावले होते? यापूर्वी त्यांनी कोणत्या ठिकाणी काम केले होते? याची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी मच्छिंद्र तापकीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.