पिंपरी (Pclive7.com):- भक्ती-शक्ती चौकातील धोकादायक स्थितीतील मोठा हायटेन्शनचा टॉवर हटविण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे. याबाबत चिखले यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाण पुलाचे काम जोरात चालु अाहे. हे काम चालु असताना मोठ्या प्रमाणात खोदाईचे काम चालु आहे. भक्ती-शक्ती चौकामध्ये बरोबर मधोमध शहरातील मोठा हायटेन्शनचा टॉवर आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाई चे काम पुर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालु आहे. अचानकपणे जर मोठे वारे व पाऊस आल्यास हा टॉवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते अशी भिती निर्माण झाली आहे. तरी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर हा टॉवर हलविण्याची कार्यवाही करावी. जर हा टॉवर कोसळून जीवितहानी झाली तर त्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.