पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच पिंपरी विधानसभेत इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं चित्र दिसू लागले आहे. लोकसभेत शिवसेना-भाजपात युती झाली असताना देखील विधानसभेच्या तोडांवर संभाव्य इच्छुकांमध्ये जुंपली आहे. सध्या पिंपरीच्या जागेवर शिवसेनेचा आमदार असताना देखील भाजपाकडून दावा केला जात आहे. सोशलमिडीयाच्या माध्यमातून आमचं ठरलयं.. आणि आमचं तुमच्या अगोदर ठरलयं.. असा कलगितुरा इच्छुकांमध्ये रंगला आहे.
शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी पुन्हा आमदार होण्यासाठी तयारी सुरू केलीयं. तर युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, शिवशाही व्यापारी सेनेचे अध्यक्ष युवराज दाखले हे देखील सेनेकडून तीव्र इच्छुक आहेत. तर भाजपामधेही इच्छुकांची संख्या मोठी आहे. खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे हे इच्छुक आहे. तसेच युतीत आरपीआयसाठी हा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भाजपा नगरसेविका सीमा सावळे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलयं की, पिंपरी विधानसभेसाठी युती होणार की नाही हे मला माहिती नाही. पण मी पूर्णतः तयारी चालू केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळणार का नाही हे पण मला माहिती नाही, जरी नाही मिळालं तरी अपक्ष निवडणूक लढवणार असे त्यांनी जाहिर करून टाकले आहे.
यावर पिंपरी विधानसभेसाठी शिवसेनेचे प्रबळ दावेदार असलेल्या युवराज दाखले यांनी प्रतिक्रिया देताना सीमा सावळे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की “सीमा सावळे या अमरावती लोकसभेसाठी इच्छुक होत्या. तेवढ्यात भाजप व शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून युती झाली. त्यामुळं सावळेंच निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढं त्यांचं काहीही चाललं नाही. म्हणून त्यांना युतीवर व स्वपक्षावर वैयक्तिक प्रचंड राग आहे. युती व्हावी म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. पण अशा काही वक्तव्यामुळे लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरी युतीच्या मावळ आणि पुणे लोकसभा समन्वयकांनी अशा लोकांवर कार्यवाही करावी. जर एखादा पदाधिकारी उघडपणे अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा करत असेल तर पक्षाने लवकर कार्यवाही करून त्यांना निर्णय घेण्यास मुक्त करावे. तसेच मावळ लोकसभेत खूप प्रयत्नातून युतीला पोषक वातावरण तयार करण्यास यश मिळाले आहे. आता जो कुणी युतीच्या आड येईल त्यांची तक्रार थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना देण्यात येईल असा ही इशारा त्यांनी दिला.
सीमा सावळे यांची “आमचं ठरलंय” अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर युवराज दाखलेंच्या समर्थकांकडून “आमचं तुमच्या अगोदर ठरलयं” अशा पोस्टव्दारे सोशलमिडीयातून उत्तर मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पिंपरी विधानसभेसाठी असलेल्या इच्छुकांमध्ये जुंपली आहे. येत्या काळात पिंपरीच्या जागेवरून युतीत चांगलाच तणाव निर्माण होणार हे मात्र नक्की..!