पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मानधनावरील नवीन कामगार घेतले जात आहेत. या प्रक्रियेमध्ये शहरातील नागरिकांनाच संधी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
राहुल कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेमध्ये नवीन कामगार विविध विभागांमध्ये मानधनावर घेत आहोत. दिवसेंदिवस शहरात बेरोजगारीची समस्या वाढतच चाललेली आहे. महापालिका मानधनावर घेत असलेले कामगार हे शहरातील नागरिक असावेत, जेणेकरुन शहरातील तरुणांना रोजगार उपब्लध होईल.
महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने येथील नागरिक रहिवासी म्हणून कर भरत आहे. त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये ७५ टक्के स्थानिक रहिवासी असावेत. यापुढे मानधनावर कामगार घेण्याची भरती प्रक्रिया होईल यामध्ये शहरातील स्थानिक रहिवाशांना संधी मिळावी. तसेच विविध खात्यांमध्ये रिक्त असणाऱ्यास जागा देखील लवकरात लवकर कायमस्वरुपी पध्दतीने भरण्यात याव्यात अशी मागणी राहुल कलाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.