पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा कारभार राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविला आहे. राज्य सरकारने भाजपचे सदाशिव खाडे यांना पदमुक्त केले आहे. आता महाविकास आघाडी सरकार नवीन लोकनियुक्त अध्यक्ष नेमणार कि विभागीय आयुक्तांकडेच कारभार कायम ठेवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची १४ मार्च १९७२ मध्ये स्थापना झाली आहे. २००१ मध्ये काँग्रेसचे बाबासाहेब तापकीर यांनी ‘प्राधिकरणा’चे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर २००४ पासून तब्बल १४ वर्ष प्राधिकरणाचा कारभार प्रशासनाकडे होता. काहीवर्ष प्राधिकरण अध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी ही पुणे विभागीय आयुक्तच सांभाळीत होते.तत्कालीन भाजप सरकारने ६ सप्टेंबर २०१क रोजी पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने भाजपने केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या. सदाशिव खाडे यांच्याऐवजी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे राज्य सरकारने प्राधिकरणाचा कारभार दिला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आता प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत. याबाबतचा आदेश नगरविकास खात्याने सोमवारी दि.३ रोजी जारी केला आहे.