पिंपरी (Pclive7.com):- चीनसह जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा धोका भारतासह महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या विषाणूबाबत खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविणे आवश्यक असताना पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि प्रशासन दोघेही यासंदर्भात उदासीन असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे.
शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची लक्षणीय संख्या पाहता जीवघेण्या कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दहा दिवसांपूर्वी 1 फेब्रुवारी रोजी केली होती. यासंदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागणीचे निवेदनही दिले होते. मात्र आयुक्तांनी सदर मागणीकडे कानाडोळा करत या गंभीर विषयावर कोणतेही पावले न उचलल्याने नगरसेवक वाघेरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात आयुक्त हार्डीकर आणि महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर टीका करताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, आज पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखांच्या जवळपास असून जर कोरोना विषाणूचा फैलाव शहरात झाला तर त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होईल. त्यामुळे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आधीच सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक असताना या विषयावर महापालिका प्रशासन मात्र उदासीन दिसून येत आहे.
आयुक्त हर्डीकर यांचे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नियंत्रण नसून त्यांनी आपल्या कार्यकाळात महापालिकेच्या किती रुग्णालयांना भेट दिली आहे? असा प्रश्न उपस्थित करून अद्यापही वेळ गेली नसून लवकरात लवकर कोरोना विषाणूसंदर्भात तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पुन्हा एकदा केली आहे.