पिंपरी (Pclive7.com):- वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने मेट्रो नियो, १३ नवीन उद्याने, शहरातील सर्वच भागातील डीपी रस्ते विकसित करणे यासह शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा अशा महत्वपूर्ण बाबी समोर ठेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचे ३८ वे अंदाजपत्रक आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीपुढे सादर केले. मूळ ५ हजार २३२ कोटी ५७ लाख रूपये आणि जेएनएनयुआरएम व केंद्र शासनाच्या इतर योजनांसह ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रूपयांचा हा अर्थसंकल्प ‘भविष्यवेधी वास्तवदर्शी अर्थसंकल्प’ असल्याचे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे भविष्यातील सर्वाधिक पसंतीचे, जगण्यायोग्य शहर व्हावे आणि त्यात आर्थिक सुबत्ता यावी याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातील प्रत्येक नागरिक केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि एकंदरीतच शहराचा दर्जा वाढवणे हेच ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ३० किलोमीटर लांबीचा HCMTR रस्ता विकसित करण्याचे नियोजन आहे. महिना अखेरीपर्यंत या मार्गाचा डीपीआर मंजूर होईल. या आरक्षित वर्तुळाकार मार्गावर भविष्याच्या आवश्यकतेनुसार मेट्रो नियो (ELEVATATED) वाहतूक सुरू करण्याकरिता ५० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर असल्याने पर्यावरणाचा समतोल राखणे महत्वाचे आहे. नागरिक व लहान मुलांच्या मनोरंजनासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची उद्याने विकसित केलेली आहेत. सध्या महापालिकेच्या परिसरात एकूण १८४ उद्याने आहेत. आता १३ नवीन उद्याने तब्बल २० एकर क्षेत्रावर नव्याने विकसित करण्याचे काम चालू आहे. यात प्रमुख्याने बोपखेल, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, जाधववाडी येथे उद्याने विकसित करण्याचे काम सुरू आहे. तर जाधववाडी, मोशी, चऱ्होली, रावेत, वाकड, पिंपळे निलख, बोपखेल या भागात नवीन उद्याने विकसित करण्याचे नियोजन आहे.
वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न शहराला भेडसावणार आहे. म्हणूनच भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच रावेत व सेक्टर २३ येथील पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात सुमारे १७३ कोटी ५० लाख एवढी तरतूद सुचविण्यात आलेली आहे.
या अर्थसंकल्प शहरातील रस्ते विकसित करणे याला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यात प्रामुख्याने वाकड भुजबळ वस्तीमध्ये डीपी रस्ता विकसित करणे यासाठी ४ कोटी, ताथवडे येथील शनि मंदिराकडून मारुंजी गावाकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे ५ कोटी, ताथवडे गावातून पुनावळेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे ४ कोटी, ताथवडे येथील जीवननगरकडून मुंबई बेंगलोर हायवेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे ४ कोटी ५० लाख, वाकड येथील काळाखडक ते वाकड पोलिस स्टेशन येथील डीपी रस्ता विकसित करणे ३ कोटी, वाकड येथील कावेरी चौक सर्वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डीपी रस्ता सिमेंट कॉंक्रिट साफ करणे यासाठी ९ कोटी ४६ लाख, पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ते अद्यावत पद्धतीने विकसित करणे ८ कोटी आदी रस्ते विकसित करण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मोशी येथील प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडेवाडी, विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पूर्ण पूतळा शिल्प उभारणे कामी येणाऱ्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच थेरगाव येथील वेंगसरकर अकॅडमी येथील पव्हेलियनचे काम करणे, थेरगाव येथे खेळाचे मैदान विकसित करणे, पिंपळे सौदागर येथे खेळाचे मैदान विकसित करणे या कामांसाठी एकूण तरतूद ११ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक १० सर्वे नं.३१/१ येथे नि:समर्थ दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे, आकुर्डी येथे मल्टीस्पेशालीटी रुग्णालय बांधणे, थेरगाव सर्वे नंबर ९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे तसेच जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथे नवीन इमारत बांधणे या कामांसाठी तब्बल १७ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मागील तीन वर्षात बांधकामातून १० टक्के उत्पन्न वाढून पालिकेच्या तिजोरीत सुमारे ५०० कोटीची भर पडली आहे. हा शहरवाढीचा वेग निश्चितच भविष्यात सर्वांधिक पसंतीचे शहर बनण्यास मदत होणार आहे. बांधकाम विभागाचे २६७ कोटीवरुन सन २०१८-१९ मध्ये ४३१ कोटी ७२ लाख, २०१९-२० मध्ये ६६८ कोटी ७० लाखाचे उत्पन्न झाले आहे. कोणतीही करवाढ न करता ३ वर्षात तिप्पट उत्पन्न वाढले असून भविष्यात बांधकाम विभागाकडे अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.