पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या तीन रूग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान आज दि.१४ रोजी कोरोनाचे आणखी ५ रूग्ण आढळले असून शहरातील रूग्णांची संख्या आता ८ वर पोहचली आहे. तर राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ वर गेली आहे. आज आणखी ५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही २६ वरुन थेट ३१ वर पोहचली आहे. शुक्रवारी ही संख्या १८ ते १९ च्या घरात होती. मात्र एका दिवसात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्याही १० ते ११ ने वाढली आहे. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल. कारण देशभरात कोरोनाचे ८५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र एकट्या महाराष्ट्रात हा आकडा ३१ वर गेला आहे.
पिंपरी चिंंचवडमधले हे पाच रुग्ण आहेत. यापैकी चारजण दुबईतून आले आहेत. तर एकजण थायलंडहून आला आहे असेही समजलं आहे. या पाचजणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील मॉल्स, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असेही आवाहन करण्यात आले आहे. जे पाच जण नव्याने कोरोनाग्रस्त आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरी नागरिकांनी घाबरून न जात दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.