पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणुक आज (दि.०१) पार पडत आहे. गेल्या महिनाभरापासून यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी सकाळच्या सत्रातच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
या निवडणुकीत भाजपाविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरताना दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था-संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला होता.
पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ६२ उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ३५ उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. पदवीधरसाठी पुणे विभागात ४ लाख ३२ हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७४ हजार ८६० इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण १ हजार २०२ मतदान केंद्र आहेत. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी दि.३ डिसेंबर रोजी होणार आहे.