पिंपरी (Pclive7.com):- दोन वर्षांपासून रखडलेले पिंपरी ते निगडी मेट्रो लाईन 1चे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे गटनेते नगरसेवक सचिन चिखले यांनी दिला आहे.
यासंदर्भात सचिन चिखले यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात चिखले यांनी इशारा देताना म्हंटले आहे की, पिंपरी चिंचवडकरांसाठी मेट्रो लाईन 1 निगडी भक्तीशक्ती चौकापर्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिकेने 2019 च्या अहवालात या कामाला मंजुरी दिली आहे. व सदर प्रकल्प अहवाल राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मात्र दोन वर्षे उलटूनही अद्याप मंजुरी मिळाली नाही.
सदर मंजुरीसाठी आपण पाठपुरावा करून हा अहवाल मंजूर करून घ्यावा अशी मागणी करीत जर सदर काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी यावेळी दिला.